मुख्यमंत्री शिंदे आणि ठाकरे आज आमने-सामने

0

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी 11:00 पासून त्यांचे पुणे शहर आणि जिल्ह्यात भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे देखील आज पुणे शहर दौऱ्यावर आहेत. आज सायंकाळी कात्रज परिसरात त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून राज्यात शिवसेनेच्या शिंदे गट आणि ठाकरे गटाची जोरदार चर्चा सुरू असताना या दोन्ही गटातील दोन्ही प्रमुख नेते आज पुण्यात प्रथमच आमने-सामने येणार आहेत. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळी 11 वाजता पुणे शहरात येणार आहेत.शहरातील विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांच्या उपस्थितीत अतिवृष्टी पेरणी आणि विकास कामांबाबत बैठक होणार आहे. त्यानंतर याच ठिकाणी त्यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. दुपारी एकनंतर ते फुरसुंगी पाणी योजना प्रकल्पाची पाहणी करतील. तर दुपारी सव्वादोन वाजता ते खंडोबा जेजुरी देवस्थान येथे जातील. त्यानंतर पावणेतीन वाजता त्यांची सासवड येथील पालखी तळ मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेनंतर हडपसर परिसरातील एका मैदानाचे उद्घाटन ते करतील आणि सर्वात शेवटी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर या ठिकाणी देखील एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या ठिकाणी ते हजेरी लावतील.

दुसरीकडे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा दौरा पार पडला असून जाहीर सभा देखील झाले आहेत. आदित्य ठाकरेंच्या निष्ठायात्रा आणि शिवसंवाद यात्रेचे अनेक शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर आदित्य ठाकरे आज पुणे शहर दौऱ्यावर आहे. सायंकाळी पाच वाजता त्यांची कात्रज चौकातील बस डेपोजवळ जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे शहरात आज शिंदे गट आणि ठाकरे गट प्रथमच आमने सामने येणार आहे. त्यामुळे या दोन्ही गटातील नेते एकमेकांबद्दल काय बोलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.