मुंबई : केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनला पाठींबा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील मंत्री रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
आगामी काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रस्त्यावर उतरून आंदोलक शेतकऱ्यांच्या लढय़ाला पाठिंबा देतील, असे नवाब मलिक यांनी सांगितले. आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत मोर्चा काढण्याच्या विचाराला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी होकार दिला आहे. आठवडाभरात हा मोर्चा काढण्याचे नियोजन असून एक-दोन दिवसांत त्याच्या तपशिलाबाबत अंतिम निर्णय होईल. करोनाविषयक नियम पाळून हा मोर्चा काढण्यात येईल, असे नवाब मलिक यांनी सांगितले.
केंद्राच्या तिन्ही कृषी कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याबाबत देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र आहेत. तिन्ही कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याचा अर्थ न्यायालयाने एक प्रकारे मोदी सरकारला वेळ देत हा विषय मिटवण्याचा संदेश दिला आहे; पण मोदी सरकार शेतकऱ्यांबाबत संवेदनशील असल्याचे दिसत नाही, अशी टीकाही नवाब मलिक यांनी यावेळी केली आहे.