मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडी सध्या वेगवान झाल्याचे पाहायला मिळत आहे. एकिकडे आरोप प्रत्यारोपाच्या फेरी सुरू असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. ही बैठक जवळपास दोन तास चालू होती. त्यामुळे या बैठकीत नेमके काय खलबते झाले याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याने राजकीय चर्चेला उधाण आलय.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर झालेल्या बैठकीतून अनेक अर्थ काढले जात आहेत. दोनच दिवसापूर्वी भाजपचे आमदार आशिष शेलार हे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर गेले होते. त्यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. त्यामुळे बैठकीत नेमकी काय खलबते झाली याची जोरदार चर्चा आहे. या बैठकीला मुंबईतील सर्व आमदार आणि खासदार उपस्थित होते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणनीती ठरवली गेली का? अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. या भेटीमध्ये एकनाथ शिंदे हे कोणाची भेट घेणार? यावरही चर्चा सुरू आहे. केंद्रात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे असताना मुख्यमंत्री यांचा हा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जातोय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले खासदार नाराज असल्याची चर्चा मधल्या काळात सुरू होती. केंद्रामध्ये मंत्रीपद मिळत नसल्याने सत्तेत वाट हवा या मागणीसाठी हे खासदार नाराज असल्याचे बोलले गेले. त्यामुळे आता या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांना मंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.