शुक्रवारी चांदणी चौकात मुख्यमंत्र्यांचा ताफा अडकला; शनिवारी प्रशासन लागले कामाला

0

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील वरिष्‍ठ अधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी चांदणी चौक परिसराला भेट देऊन वाहतूकीची समस्या, वाहतूक कोंडीची कारणे आणि सुरु असलेल्या कामांची माहिती घेतली. पुढील 15 दिवसांत परिसरातील जुना पूल पाडून रस्त्याच्या लेनचे काम त्वरीत करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा शुक्रवारी सायंकाळी चांदणी चौकाच्या गर्दीत अडकला होता.

या वेळी अगदी पाषाणपर्यंत गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतुक पोलिसांनाही या गर्दीतून मुख्यमंत्री शिंदे यांच्या ताफ्याला कशी जागा करुन द्यावयाची हा प्रश्न पडला होता.

यावेळी स्थानिक नागरीकांना शिंदे यांच्याकडे याबाबत तक्रारी केल्यानंतर लगेचच शिंदे यांनी संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास पिंपरी चिंचवडचे वाहतुक शाखा उपायुक्त आनंद भोईटे यांनी संबंधित स्थळाला भेट देऊन पाहणी केली.

पुणे शहरातील चांदणी चौकात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडी संदर्भात स्थानिक प्रवाश्यांनी साताराला जात असताना वाटेतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधत गाऱ्हाणे मांडले होते.मुख्यमंत्री  शिंदे यांनी तात्काळ याची दखल घेत संबंधीत सर्व अस्थापनांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीची पाहणी करून प्रवाश्यांची समस्या सोडवण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार चांदणी चौक परिसराला भेटीनंतर वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली.बैठकीस महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम, उपविभागीय अधिकारी संजय आसवले आदी उपस्थित होते.

पश्चिमेकडून येणाऱ्या 9 लेनची संख्या चांदणी चौकाजवळ केवळ तीनच होत असल्याने वाहतूकीची समस्या निर्माण होते. हे लक्षात घेऊन बैठकीत लेनची संख्या वाढविण्याच्यादृष्टीने विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली.रस्त्याच्या सुरु असलेल्या कामांना अधिक वेग देण्याचे निर्देश विक्रमकुमार आणि डॉ. देशमुख यांनी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.