चिंचवड पोटनिवडणूक : भाजपची उमेदवारी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना जाहीर
पिंपरी : चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपची उमेदवारी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना जाहीर झाली आहे. लक्ष्मणभाऊंचा वारसा अश्विनीताई चालविणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच जगताप कुटूंबियांच्या घरी भेट देत अश्विनी जगताप यांची उमेदवारी निश्चित केली होती.
चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे ३ जानेवारी रोजी दुर्धर आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी अवघ्या १५ दिवसात अनपेक्षितपणे पोटनिवडणूक जाहीर झाली. २६ फेब्रुवारीला मतदान तर २ मार्चला मतमोजणी होणार आहे. ३१ जानेवारी पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.
भाजपकडून उमेदवारीसाठी दिवंगत आमदार जगताप यांच्या पत्नी अश्विनी आणि बंधू शंकर जगताप यांच्या नावाची चर्चा होती. दोघांनीही उमेदवारी मागितल्याने पक्षनेतृत्वासमोर पेच निर्माण झाला होता. दोघांनीही भाजपसाठी उमेदवारी अर्ज घेतले होते. त्यामुळे दोघांपैकी नेमकी भाजपची अधिकृत उमेदवारी कोणाला मिळेल, जगताप यांचा राजकीय वारसदार कोण होईल, याकडे शहरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागले होते.
अखेरीस भाजप नेतृत्वाने जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अश्विनी जगताप सोमवारी दुपारी एक वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे आता विरोधी पक्षाचा उमेदवार कोण असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.