पिंपरी : शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यानं आता चिंचवड विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. या मतदारसंघात भाजपकडून अश्विनी जगताप यांना तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रचाराला सुरुवात झाली असून, चिंचवड मतदारसंघात रात्रीत लागलेल्या ‘फ्लेक्स’ची जोरदार चर्चा आहे.
भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघ रिक्त झाला आहे. या मतदारसंघात पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली असून, येत्या 26 फेब्रुवारी रोजी या जागेसाठी मतदान होणार आहे. चिंचवड मतदारसंघात भाजप उमेदवार अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे.
राहुल कलाटे यांनी आपली उमदेवारी मागे घ्यावी यासाठी महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून त्यांची मनधरणी सुरू होती. मात्र त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यानं महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यातच आता अज्ञात व्यक्तीने चिंचवडमध्ये बॅनर लावले आहेत. खरा शिवसैनिक नावाने हे बॅनर लावण्यात आले आहेत.
रहाटणी, सांगवी, काळेवाडी आदी ठिकाणी फ्लेक्सबाजी पहायला मिळत आहे. या बॅनरमधून निशाणा साधण्यात आला आहे. ‘ एका अपक्षाची गद्दारी खोक्यातून, नागपूरची गुलामी, ठाण्याची गद्दारी…एकदम ओक्के डोक्यातून- खरा शिवसैनिक ‘ अशा अशायाच बॅनर मतदारसंघात दिसून आलं आहे. दरम्यान आता या बॅनर वॉरवरून पुन्हा एकदा चिंचवड मतदारसंघात राजकारण तापण्याची शक्यता आहे.