पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यातच आज सकाळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विठ्ठल उर्फ नाना काटे यांची उमेदवारी घोषीत केली आहे.
जयंत पाटील यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली असून नाना काटे यांना विजयी करण्याचे आव्हान केले आहे. चिंचवड मतदार संघातून महाविकास आघडीकडून अनेक नावे चर्चेत होती. राष्ट्रवादीकडून 10 इच्छुकांनी मुलाखती दिल्या होत्या. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडूनही अनेकजण इच्छुक होते.
शिवसेनेचे राहुल कलाटे यांना महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. तसे संकेतही देण्यात आले होते. मात्र आज राष्ट्रवादीचे नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांना अधिकृतपणे उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे. ते आज शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरणार आहेत.