मुंबई : कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक टाळण्यासाठी आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून शिंदे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केल्याचं वृत्त आहे. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्याकडून काहीही झाले तरी महाविकास आघाडी निवडणूक लढवणार असे व्यक्तव्य खासदार संजय राऊत यांनी दिले आहे.
दोन्ही मतदारसंघातील आमदारांचं निधन झाल्याने ही निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत उमेदवार देऊ नका, असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी या नेत्यांना केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना फोन केला. एखाद्या लोकप्रतिनिधीचं निधन झालं तर त्या मतदारसंघात उमेदवार न देण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. ही परंपरा विरोधी पक्षाने जपावी असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नेत्यांना केल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे यांच्या या फोनला विरोधी पक्षाकडून कसा प्रतिसाद दिला जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने हेमंत रासणे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने कसब्यातून टिळक कुटुंबीयांना डावलून रासणे यांना उमेदवारी दिली आहे. तर चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. तर चिंचवड मतदार संघातून महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा आहे.