चिंचवड, कसबा पोटनिडणूक : पोलिसांचा तगडा बंदोबस्त, प्रशाकीय यंत्रणा सज्ज

उद्या रविवार सकाळी 7 ते सायंकाळी 6 वेळेत होणार मतदान

0

पिंपरी : कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे देवकाते आणि उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले.

कसबा पेठ विधानसभा मतदार संघात रविवारी 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या मतदार संघामध्ये एकूण 2 लाख 75 हजार 679 मतदार असून 270 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. 26 फेब्रुवारीच्या मतदान प्रक्रियेसाठी 1 हजार 250 अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येकी 10 याप्रमाणे 27 टेबलवर मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले.

साहित्य वितरणापूर्वी कर्मचाऱ्यांना विहीत नमुन्यातील माहिती भरताना घ्यावयाची काळजी, ईव्हीएम यंत्रातील तांत्रिक अडचणी कशा दूर कराव्यात, साहित्य स्वीकारताना व जमा करताना घ्यावयाची काळजी याबाबत मागदर्शन करण्यात आले. अनुपस्थित कर्मचाऱ्यांच्या बदली काम करण्यासाठी 27 पथके राखीव ठेवण्यात आली आहेत. मतदानादिवशी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून यंत्रणा सज्ज झाली आहे. 600 पोलीस कर्मचारी व 83 अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मतदान साहित्य ताब्यात घेतल्यानंतर नेमून दिलेल्या मतदार केंद्रावर पोहोचण्यासाठी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामध्ये पीएमपीएमएलच्या 43 बसेस, 7 मिनीबस आणि 10 जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी साहित्य वितरण ठिकाणी वाहतुक व्यवस्थेचा तपशील दर्शनी भागात लावण्यात आला होता.

निवडणूकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांपैकी 54 कर्मचारी कसबा पेठ मतदारसंघातील मतदार आहेत. त्यांच्यासाठी साहित्य वितरण ठिकाणी टपाली मतदान सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पहिल्या व दुसऱ्या प्रशिक्षणादरम्यान या 54 कर्मचाऱ्यांना टपाली मतदानासाठीचे अर्ज देण्यात आले होते. त्यानुसार शनिवारी संबंधित कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. अशाच प्रकारे चिंचवड मध्ये 248, जणांना टपाली मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

चिंचवड मतदार संघामध्ये एकूण 5 लाख 68 हजार 954 मतदार असून 510 मतदार केंद्रावर मतदान होणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी सुमारे 3 हजार अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. अनुपस्थित कर्मचाऱ्यांच्या बदली काम करण्यासाठी 51 पथके राखीव ठेवण्यात आली आहेत. मतदानादिवशी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. यासाठी 3 हजार 707 पोलीस कर्मचारी व 725 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मतदान केंद्रावर आवश्यक असलेल्या निवडणूक साहित्याचे वाटप करण्यासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे साहित्य जमा करून घेतले जाणार असून स्वीकृतीचे काम थेरगाव येथील शंकरआण्णा गावडे कामगार भवन येथे होणार आहे. साहित्य वाटप करण्याकरीता 111 कर्मचारी तर स्वीकृतीसाठी 148 कर्मचारी तसेच नियंत्रण पथक नियुक्त करण्यात आले आहे.

साहित्य वाटपासाठी नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी सकाळपासून 26 टेबलद्वारे मतदान केंद्रनिहाय साहित्य वाटप कामकाजाला सुरुवात केली. मतदान केंद्रनिहाय मतदान केंद्राध्यक्ष आणि सहायक मतदान केंद्राध्यक्षांकडे ईव्हीएम म्हणजेच बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्र, आवश्यक साहित्य तसेच मतदान प्रक्रीयेविषयीचे विविध पाकीटे आणि लिफाफे आदी साहित्य सुपूर्द करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.