आवास योजनेच्या निवड, प्रतिक्षा यादीत नाव नसलेल्यांचे पैसे परत देण्यास सुरुवात

0

पिंपरी : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी आणि रावेत या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्लब घटकांसाठी राबविण्यात आलेल्या गृहप्रकल्पाच्या निवड अथवा प्रतिक्षा यादीत नाव नसलेल्या अर्जदारांचे डिमांड ड्राफ्टचे पाच हजार रुपये परत देण्यास सुरुवात झाली आहे. अर्जदारांच्या थेट बँक खात्यावर पाच हजार रुपये ट्रान्सफर केले जात आहेत.

38 हजार जणांचे पैसे देण्याची कार्यवाही सुरू असून आजपर्यंत 21 हजार अर्जदारांचे प्रत्येकी पाच हजार ट्रान्सफर केले आहेत. याबाबतची माहिती झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी दिली.

पंतप्रधान आवास योजना : सर्वांसाठी घरे – 2022 या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने पिंपरी – चिंचवड महापालिकेला 72 हजार 326 घरकुलांचे उद्दीष्ट दिले आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी गरीबी निर्मुलन मंत्रालयाच्या वतीने महापालिका क्षेत्रात आवास योजना राबविण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने या योजनेअंतर्गत चऱ्होली (सदनिका 1442), रावेत (सदनिका 934) आणि बोऱ्हाडेवाडी (सदनिका 1288) येथे आर्थिकदृष्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी 3 हजार 664 सदनिका बांधण्याचे काम सुरू आहे.

त्यासाठी महापालिकेने देशात कोठेही नावावर घर आणि तीन लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसलेल्या पिंपरी-चिंचवड शहारातील नागरिकांकडून अर्ज मागविले होते. सुमारे 48 हजार जणांचे अर्ज आले होते. अर्जासोबत पाच हजार रुपयांचा धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) घेतला होता. या सदनिकांसाठी लॉटरी पद्धतीने आरक्षण सोडत काढण्यात आली. लॉटरीमध्ये 3 हजार 664 जणांची निवड झाली. महापालिकेने 3664 एक आणि 3664 दोन अशा दोन प्रतिक्षा याद्या केल्या आहेत. ज्यांचे निवड अथवा प्रतिक्षा यादीत नाव नाही, अशा 38 हजार जणांचे डिमांड ड्राफ्टसाठी जोडलेले पाच हजार रुपये परत देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. आजपर्यंत 21 हजार अर्जदारांचे प्रत्येकी पाच हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले आहेत.

झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे म्हणाले, “महापालिकेने अर्जासोबत पाच हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट घेतला होता. निवड, प्रतिक्षा यादीत नाव नसलेल्या 38 हजार जणांचे डिमांड ड्राफ्टसाठी जोडलेले पाच हजार रुपये परत केले जात आहेत. विभागाकडून बँक ऑफ बडोदाला अर्जदारांची यादी दिली जाते. त्यानुसार बँक थेट अर्जदारांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करते. आजपर्यंत 21 हजार अर्जदारांचे पैसे त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले आहेत. या आठवड्यात उर्वरित अर्जदारांचे पैसे त्यांच्या खात्यात ट्रान्सफर होतील”.

Leave A Reply

Your email address will not be published.