शहरात चोरट्यांचा धुमाकूळ : सहा चोरीच्या घटना; सहा लाख 19 हजारांचा ऐवज लंपास

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात चोरट्यानी धुमाकूळ घातला आहे. आयुक्तालयात भोसरी एमआयडीसी, सांगवी, वाकड, चिखली, पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या सहा घटना उघडकीस आल्या आहेत. या घटनांमध्ये 6 लाख 19 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये सोमवारी (दि. 11) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विवेक अनंतराव चिद्दरवार (61, रा. भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिलन (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे डॉक्टर असून त्यांचा वॉचमन/कामगार असलेल्या आरोपी मिलनकडे फिर्यादीच्या बिल्डींगची रखवालीची जबाबदारी होती. मिलनने फिर्यादीच्या घराच्या दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातून तीन तोळे आठ ग्रॅमचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, हातातील तीन घड्याळे, असा एकूण दोन लाख 28 हजार 600 रुपये किमतीचा ऐवज चोरी केला. गुरुवारी (दि. 7) रात्री 12 ते शुक्रवारी (दि. 8) सकाळी साडेनऊच्या दरम्यान चोरीचा हा प्रकार घडला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

नितीन रामचंद्र कदम (49, रा. साई मल्हार कॉलनी, तापकीर नगर, काळेवाडी) यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या घराचा दरवाजा उघडा असताना अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातून एक लाख आठ हजार रुपये किमतीचे तीन तोळे 6.390 ग्रॅमचे सोन्याचे दागिने चोरट्याने चोरी करून नेले. चोरीचा हा प्रकार 5 ऑक्टोबरला घडला. वाकड पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत
लखन श्रीरंग सूर्यवंशी (21, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राम मंडलिक (22, रा. पिंपळे गुरव) व एक अनोळखी इसम यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीच्या घराचा दरवाजा उघडा असताना आरोपींनी घरात प्रवेश केला. घरातून 80 हजारांची रोकड, दोन मोबाईल, असा एकूण 83 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. चोरीचा हा प्रकार सोमवारी (दि. 11) घडला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

दिलीप विश्वनाथ जाधव (35, रा. आनंदवन सोसायटी, थेरगाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीने त्यांची 50 हजार रुपये किमतीची दुचाकी 3 ऑक्‍टोबरला सायंकाळी सव्वासातच्या सुमारास मोरवाडी चौकात लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ती दुचाकी चोरून नेली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

वेस्ली वर्गीस (19, रा. वल्लभ नगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांचे मित्र रूमच्या दरवाजाची आतून कडी न लावता रूममध्ये झोपले होते. त्यावेळी चोरट्यांनी फिर्यादीचा पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल, अब्दुल्लाह उमर शेख बिस्मिल्लाह (19) यांचा सात हजार रुपये किमतीचा मोबाईल, अभिजेय बी. (20) यांचा नऊ हजार रुपये किमतीचा मोबाईल, शालिम स्वरूपकुमार शिंदे यांचा 40 हजार रुपये किमतीचा मोबाईल, असे एकूण 61 हजार रुपये किमतीचे चार मोबाईल चोरून नेले. चोरीचा हा प्रकार रविवारी (दि. 10) रात्री साडेअकरा ते सोमवारी (दि. 11) सकाळी आठ वाजताच्या कालावधीत घडला.

संचिता केशव मोरे (35, रा. सुदर्शन नगर चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची नजर चुकवून अज्ञात चोरटा त्यांच्या घरात घुसला. घरातून 89 हजार रुपये किमतीचे 27 ग्रॅमचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले. चोरीचा हा प्रकार शनिवार (दि. 9) ते सोमवार (दि. 11) या कालावधीत घडला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.