मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री यांच्यात बंद खोलीत चर्चा

0

मुंबई : भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेले वादग्रस्त वक्तव्य आणि त्यानंतर नारायण राणे.यांना झालेली अटक आणि सुटकेच्या नाट्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. अशा स्थितीत भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या काल बंद दाराआड चर्चा झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. मात्र, आता यावर स्वता फडणवीसांनीच खुलासा केला आहे.

याबाबत प्रसार माध्यमांना स्पष्टीकरण देताना देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यात केवळ ओबीसी आरक्षणाबाबतच चर्चा झाली, अन्य कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, हे खरच आहे. चर्चा सगळ्यांसमोर झाली ती लपून-छपून झालेली नाही. बैठकीनंतर हॉलच्या बाजूला त्यांचे ऑफिस आहे. तिथे दहा मिनटे आम्ही ओबीसी आरक्षणावर चर्चा केली.

फडणवीस पुढे म्हणाले, जे बैठकीत झाले त्याबाबत मी काही मत बैठकीत मांडले होते, तेच मी पुन्हा त्यांना सांगितले. म्हटले, अशाप्रकारे आपण केले तर तीन-साडेतीन महिन्यात आपण ओबीसींचे राजकीय आरक्षण परत करू शकतो. त्यावर ते म्हणाले तुम्ही सहकार्य करा, मी म्हणालो आम्ही संपूर्ण सहकार्य करण्यासाठी तयार आहोत. याशिवाय आमची काहीही चर्चा झालेली नाही.

शुक्रवारी ओबीसी आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात सह्याद्री अतिथीगृहातील बंद दालनात 15 मिनिटे चर्चा झाली होती. यावरून राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही बंद दारामागील बैठकीवर भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले, दोघांमध्ये काय चर्चा झाली हे माहीत नाही. पण दोघांच्या चर्चेमुळे कदाचित पुन्हा शिवसेना- भाजपा एकत्र येऊ शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.