लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या नवीन मार्गावर सुरु असलेल्या बोगद्याच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
यावेळी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनिल शेळके, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी लोणावळ्याजवळील कुसगाव ते खोपोली दरम्यान उभारण्यात येत असलेल्या भूमिगत बोगदा आणि मिसिंग लिंकच्या मार्गिकेच्या कामाची माहिती मुख्यमंतत्री ठाकरे यांना दिली. खोपोली ते कुसगाव बाह्यवळण दरम्यान १३.३ किलोमीटर अंतराचा भूमिगत बोगदा आणि मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत बोगद्याचे दोन किलोमीटर अंतरापर्यंतचे काम झाले आहे. या प्रकल्पात १०.५५ किलोमीटर लांबीचा बोगदा असणार आहे. त्यापैकी अडीच किलोमीटर अंतर बोगदा हा लोणावळा धरणाच्या जलाशयाच्या ११४ ते १७५ मीटर खालून जाणार आहे.
लोणावळा खंडाळा डोंगर, पठारावरील दऱ्यांतून नऊशे मीटर लांबीचा एक व्हायडक्ट पूल व दुसरा ६५० मीटर अंतराचा केबल स्टॅन्ड पुल असणार आहे. हा प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा (बोरघाट) घाटात होणारी रोजची वाहतूक कोंडी आणि अपघातांना आळा बसु शकतो. या प्रकल्पामुळे अवजड वाहनांसाठी खंडाळा घाटमाथा परिसरात लागणारा प्रवासाचा वेळ २० ते २५ मिनिटांनी कमी होईल आणि घाटातील वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल, असे सांगण्यात आले.