मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पीएमसी बँक घोटाळ्यातील पैसा भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांनी एका प्रकल्पात गुंतवल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी नील सोमय्यांना अटक होण्याची शक्यता आहे. पण अटक टाळण्यासाठी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. मुंबई सत्र न्यायालयाने नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असल्याने त्यांच्या अटकेची शक्यता वाढली आहे.
यावर संजय राऊत यांनी पुन्हा एकदा किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. “जर कोणताही गुन्हा केला नसेल, तर पिता-पुत्र जोडी (किरीट सोमय्या आणि नील सोमय्या) अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात का जात आहे? माझे शब्द नोंदवून ठेवा, हे पिता-पुत्र आणि केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करणारे आणखी काही लोक एक दिवस तुरुंगात जातील. बघत रहा काय होते. आतापर्यंत तुम्ही इतरांना धमकी देत होता. आता आम्ही काय करतो ते पहा, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.
“आजपर्यंत पीएमसी घोटाळा, खंडणी यासारखी अनेक प्रकरणं दाबून ठेवली होती. पण आता बरेच लोक समोर येऊ लागले आहेत. यात काही अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. पण ते जर निर्दोष आहेत, तर बाप-बेटे अटकपूर्व जामिनासाठी का धावपळ करत आहेत, असा सवाल संजय राऊत यांनी केला.