सातारा : जर्मन येथुन येऊन थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वर, वाई येथे ‘रो- हाऊस’ घेऊन राहणाऱ्या दोन परदेशी तरुणांचा डाव सातारा पोलिसांनी उधळून लावला आहे. या दोन तरुणांनी ‘रो-हाऊस’च्या परिसरात पॉलीहाऊस उभा करुन त्यामध्ये गांजाची शेती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार; सर्गीस व्हिक्टर मानका (31), सेबेस्टीन स्टेन मुलर (25, दोघे मूळ जर्मन, सध्या वाई) अशी आरोपींची नावे आहेत. वाई शहरातील श्री विष्णूस्मृती बंगल्यात दोन परकीय नागरिक रहात असून त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याची माहिती जिविशा पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला.
या छाप्यात पोलिसांना दोन जर्मन देशाचे नागरिक बंगल्यात आढळून आले. पोलिसांनी बंगल्याची पाहणी केली असता त्यामध्ये पॉली हाऊस उभारण्यात आले होते. तसेच गांजाची लहान, मोठी रोपे आढळून आली. बंगल्यातच गांजाची शेती पिकवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्या ठिकाणी रोपे तयार करण्यापासून ती वेगवेगळ्या कुंडीत वाढवून तिथे गांजा पिकवण्यात येत होता.
2 लाख 36 हजार 760 रुपये किंमतीचा 29 किलो वजनाचा गांजा असल्याचे समोर आले. याशिवाय कोकोपीट, खत, भुसा, फ्लॉवर ग्रोथ बुस्टर, केमिकल फवारणीचे पंक, तीन एप्झॉट फॅन्स, पाच तापमापक दर्शक मिटर, पॅनल, इन्व्हर्टर, बॅटरी, तीन पॉली हाऊस, तीन मोटार सायकल, लॅपटॉप, मोबाईल असा एकूण 8 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल होता.