व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरामध्ये २५० रुपयांची वाढ

0

पुणे : आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिकांना सरकारने महागाईचा मोठा झटका दिला आहे. पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरचे नवे दर जाहीर करण्यात आले असून या नव्या दरानुसार व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरामध्ये तब्बल २५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याचवेळी घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात २२ मार्च रोजी ५० रुपयांनी  वाढ करण्यात आले होते. तर व्यावसायिक सिलिंडर स्वस्त झाले होते.

१ मार्च रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात १०५ रुपयांनी वाढ करण्यात आली होती. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ केल्याचा फटका अगदी चहा टपरीवाल्यापासून ते हॉटेल व्यावसायिकांपर्यंत सर्वांनाचा बसणार असून पर्यायाने त्याचा भुर्दंड ग्राहकांच्या खिशाला होणार आहे.

काळा बाजारवाल्यांचे फावणार घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठी तफावत असल्याने घरगुती गॅस सिलिंडर व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये भरुन त्याची विक्री करणारी मोठी यंत्रणा सध्या सर्वत्र निर्माण झाली आहे.

दोनच दिवसांपूर्वी कात्रज येथे अशाच प्रकारे घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस काढून तो व्यावसायिक छोट्या सिलिंडरमध्ये भरताना मोठा स्फोट झाला होता. त्यात मोठी आग लागली होती. असे प्रकार वारंवार होत असतात.
त्याचबरोबर यापूर्वी पोलिसांनी अशा प्रकारे धोकादायक पद्धतीने गॅस भरून काळा बाजार करणार्‍यांवर कारवाईही गेली आहे. किंमतीतील वाढती तफावतीमुळे हा काळा बाजार अधिक फोफावू शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.