मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर महिन्याला 100 कोटी वसुलीचे आरोप केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. अनिल देशमुख यांच्याविरोधात मुंबईच्या मलबार हिल पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आलीये. अॅड. जयश्री लक्ष्मणराव पाटील यांनी ही तक्रार दिली आहे.
“मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं असून त्यात त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिल्याचा दावा केला आहे.
या पत्रात सिंग यांनी गंभीर आरोप केले आहेत. हे आरोप म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार केल्याचे पुरावे आहेत,” असं पाटील यांनी आपल्या तक्रारीत म्हटंलय. तसेच, यामध्ये मास्टरमाईंट महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख, शरद पवार आणि सचिन वाझे हे आहेत, असा आरोपीही पाटील यांनी आपल्या लेखी तक्रारीमध्ये केलाय.
यावेळी जयश्री पाटील यांनी या प्रकरणात मोठे नेते असले तरी कोणाचीही गुन्ह्यातून सुटका करता येत नाही, असे स्पष्ट निर्देश उच्च न्यायालयाने दिल्याचे सांगितले. तसेच, अनिल देशमुख, सचिन वाझे, शरद पवार यांच्या संदर्भातील संभाषणाचे पुरावे जतन होणे गरजेचे असल्याचेसुद्धा पाटील यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.