मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची ईडीने 8 तास चौकशी केली. चौकशीनंतर नबाव मलिक यांना अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने नवाब मलिक यांना 9 दिवसांची ईडीची कस्टडी दिली. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.
आघाडी सरकारच्या मंत्र्यांकडून केंद्र सरकार सूडाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला जाता आहे. तर दुसरीकडे भाजपचे नेते मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. मात्र मलिक यांचा राजीनामा घेणार नसल्याची भूमिका सरकारने स्पष्ट केली आहे. तसेच भाजप नेत्यांवर का कारवाई होत नाही, असा सवाल राष्ट्रावादीकडून विचारला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करुन फडणवीस दाम्पत्यावर अद्याप कारवाई का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे. ॲक्सिस बँक प्रकरणाची तक्रार ईडीकडे 3 वर्षापूर्वीच देण्यात आली होती. मात्र, अद्यापही दोघांपैकी एकालाही ईडीने बोलावले नाही. ईडी कुणाच्या इशाऱ्यावर नाचतेय ? असा प्रश्न अमोल मिटकरी यांनी विचारला आहे.
4 सप्टेंबर 2019 म्हणजे 3 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना मोहनीश जबलपुरे यांनी ॲक्सिस बँक नुकसानीचे सप्रमाण लेखाजोखा ईडीकडे सादर केला, त्याचा हा पुरवा. या तीन वर्षात दोघांपैकी एकालाही ईडीने बोलावले नाही. ईडी कुणाच्या इशाऱ्यावर नाचतेय ? असे ट्विट मिटकरी यांनी केले आहे.
4 सप्टेबर 2019 म्हणजे 3 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना मोहनिश जबलपुरे यांनी ॲक्सिस बँक नुकसानीचा सप्रमाण लेखाजोखा ED कडे सादर केला त्याचा हा पुरावा. या तीन वर्षात दोघांपैकी एकालाही ED ने बोलावले नाही. ED कुणाच्या इशाऱ्यावर नाचतेय? pic.twitter.com/7DJ1RiajEV
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 23, 2022
मलिकांचा राजीनामा घेणार नाही
नवाब मलिक यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने बुधवारी चौकशीनंतर अटक केली. विशेष न्यायालयाने 3 मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. नवाब मलिक यांच्या पाठीशी महाविकास आघाडी भक्कमपणे उभी आहे.
मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा कोणत्याही परिस्थितीत घेतला जाणार नाही, असे महाविकास आघाडीच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व महलूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर ही बैठक झाली.