पुणे : काँग्रेसचे नेते राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर सध्या पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे. त्यांची प्रकृती खालावली असून त्यांना मुंबईतील लिलावती हॉस्पिटलमध्ये हलविण्यात येणार आहे.
राजीव सातव यांना २२ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी स्वत: ट्विट करुनही माहिती दिली होती. त्यानंतर त्यांना जंहागिर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सावत यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे त्यांना पुण्याहून मुंबईत हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राजीव सातव हे राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील विश्वासु शिलेदार आहेत. २०१४ मध्ये मोदी लाट असतानाही ते हिंगोलीमधून लोकसभेवर निवडुन गेले होते़. त्यांच्यावर गुजरातमध्ये काँग्रेस प्रभारीपदाची जबाबदारी आहे.
राजीव सातव यांची तब्येत खालावल्याचे कळताच स्वत: राहुल गांधीनी फोन करुन डॉक्टरांकडे विचारपूस केली आहे. सध्या राज्यमंत्री विश्वजित कदम हे सातव यांच्यासोबत आहेत.