काँग्रेस कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना शक्य ती सर्व मदत करावी !: नाना पटोले

0
मुंबई : मुसळधार पाऊस, ढगफुटी, पूरस्थिती आणि दरडी कोसळून राज्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांचे प्राण गेले असून हजारो लाखो लोक पुरामुळे बेघर झाले आहेत. राज्य सरकार बाधित लोकांना मदत करत असून काँग्रेस कार्यकर्त्यांनीही आपल्या परीने शक्य ती सर्व मदत करावी, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
पटोले पुढे म्हणाले की, ‘राज्यात मागील तीन चार दिवसापासून झालेल्या अतिवृष्टी व दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये जीवित व वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. पुराने थैमान घातले असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. राज्यावर आलेली ही नैसर्गिक आपत्ती मोठी आहे. अतिवृष्टीने शेती, शेतमाल, जीवनावश्यक वस्तू, घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्तीग्रस्त भागात मदत व बचाव कार्याची सध्या मोठी गरज आहे. अन्नधान्य, औषधं, कपडे, राहण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. जे लोक अडकून पडले आहेत त्यांच्या शोधकामातही काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग घ्यावा. काँग्रेसचे स्थानिक आमदार व मंत्रीही पूरग्रस्त भागाची पाहणी करून प्रशासनाच्या माध्यमातून मदत पोहचवत आहे. मी स्वतः सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे. लोकांना मदतीची गरज आहे. या संकटात त्यांना यथाशक्ती मदत करावी.
कोरोना संकटातही काँग्रेस कार्यकर्ते मदतीसाठी धावून गेले होते. संकट काळात जनतेच्या मदतीला धावून जाणे काँग्रेसची परंपरा आहे. राज्यावर मागील दीड दोन वर्षापासून संकटामागून संकट येत आहेत, आता पुन्हा नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या संकटावरही आपण मात करू असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.
Leave A Reply

Your email address will not be published.