पुणे : कराराप्रमाणे इंटेरियर डिझाईनचे काम न करणाऱ्या फर्मला ग्राहक आयोगाने सहा लाख रुपये दहा टक्के व्याजाने परत करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नुकसान भरपाईपोटी ५० हजार आणि तक्रार अर्जाचा खर्च म्हणून पाच हजार रुपये फर्मला संबंधित ग्राहकाला द्यावे लागणार आहे.
अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष जे. व्ही.देशमुख, सदस्य अनिल जवळेकर आणि शुभांगी दुनाखे यांनी हा निकाल दिला आहे. याबाबत अमिष गोसाई (रा. केसनंद रोड, वाघोली) यांनी ॲड. अशोक ढोबळे यांच्यामार्फत इलेमेन्टस इंटेरियर प्रोप्रायटरतचे समीरण एस. मंडल यांच्या विरोधात दावा दाखल केला होता.
तक्रारदार यांचा केसनंद रोड, वाघोली येथे फ्लॅट आहे. तेथे तक्रारदारांना इंटेरियर डिझाईन्सचे काम करायचे होते. इलेमेंन्टस इंटेरियर ही इंटेरियर डिझाईनची काम करणारी फर्म आहे. त्यानुसार तक्रारदारांनी २५ फेब्रुवारी २०२० रोजी सदनिका पाहण्यास सांगितले. फर्मने काम करायची तयारी दर्शविली. त्यानुसार दोघांत सहा जून रोजी करारनामा झाला. कामाचा मोबदला सात लाख रुपये निश्चित करण्यात आला होता. लॉकडाऊन सुरू झाल्याने संपूर्ण काम ठप्प झाले. अनलॉकनंतर काम सुरू करून देण्याची मागणी तक्रारदारांनी केली. मात्र, विरोधी पक्षांनी ते टाळले. तसेच, करारापेक्षा जास्त पैशाची मागणी केली.
त्यानंतर तक्रारदारांनी कायदेशीर नोटीस बजावली. त्यास उत्तर देण्यात आले नाही. राहिलेले कामही करून देण्यात आले नाही. तक्रारदारांनी वेळोवेळी सहा लाख रुपये दिले होते. उर्वरित पैसेही देण्यास ते तयार होते. मात्र, केवळ ३० टक्केच काम करून देण्यात आले होते. त्यामुळे तक्रारदारांनी आयोगात धाव घेतली. सहा लाख रुपये, मानसिक, शारीरिक त्रासापोटी दोन लाख, तक्रार अर्जाचा खर्च २५ हजार रुपये १८ टक्के वार्षिक व्याजाने मिळावे, अशी मागणी त्यांनी केली होती. नोटीस बजावूनही विरोध पक्ष फर्मकडून कोणीही आयोगात हजर राहिले नाही.