आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल

आमदार पुत्रासह इतरांवर खुनी हल्ल्याचे दोन गुन्हे दाखल

0

पिंपरी : पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. गोळीबार केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे तर कंत्राटदाराच्या कार्यालयात घुसून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आमदार बनसोडे यांचा मुलगा, पीएसह इतर 8 जणांवर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास गोळीबार झाला. झाडलेल्या गोळ्यांमधून आमदार सुखरुप बचावले. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. अँथोनी यांचा कंपनीला महापालिकेचे कचरा उचलण्याचे काम मिळाले आहे. या कंपनीत स्थानिक तरुणांना काम मिळावे यासाठी अँथोनी यांच्या कंपनीचे तानाजी पवार याला कार्यालयात बोलवले होते. तानाजी पवार हा त्याच्या इतर दोन साथीदारांसोबत आला होता.

आमदार यांच्यासोबत चर्चा सुरु असताना पवार याने त्याच्याकडील पिस्तूलातून सिद्धार्थ बनसोडे, आमदार अण्णा बनसोडे आणि कार्यकर्ते यांच्या दिशेने गोळीबार केल्याचे फिर्यादी सवनकुमार रमेश सल्लादुल्लू यांनी म्हटले आहे. तर पोलिसांनी तानाजी भगवान पवार, संकेत जगताप आणि श्रीनिवास बिरासदार यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

अँथोनी यांच्या आकुर्डी येथील कार्यालयासमोर 11 मे रोजी घडलेल्या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे. आमदार पुत्र सिद्धार्थ, त्यांच्या पीएसह दहा जणांनी कार्यालयात प्रवेश केला. जमावबंदी कायदा लागू असताना गोंधळ घातला. याप्रकरणी स्वाती सचिन कदम यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर
आमदार बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ, त्यांच्या पीएसह दहा जणांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी निगडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ आणि इतर जण कार्यलयात घुसले. तेथे दोन कर्मचाऱ्यांना मारहाण करत गोंधळ घातला. तानाजी पवार कुठे आहे, ते सांगा असं उपस्थित कर्मचाऱ्यांना त्यांनी धमकावले. पण माहित नाही, असं म्हणताच दोन कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर खेचण्यात आलं. तेथे एकाच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आमदारांच्या दिशेने गोळीबार करणाऱ्या तानाजी पवार याने देखील पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी आमदारांचा मुलगा सिद्धार्थ, पीए आणि इतर 20 ते 21 जणांविरुद्ध अपहरण, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

आमदार बनसोडे यांना फोन वर अर्वाच्य भाषेत बोलल्याचा राग मनात धरून दोघांनी माझे माझ्या कार्यालयातून अपहरण करुन बनसोडे यांच्या कार्यलयात आणले. तेथे सिद्धार्थ बनसोडे आणि इतरांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. लोखंडी रॉड डोक्यात घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.