‘कोरोनाची महामारी रोखणं आणखी कठीण होईल’

डब्ल्यूएचओनं व्यक्त केली भिती

0
नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत असताना तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. कोरोनाच्या नव्या डेल्टा व्हेरिएंटमुळे तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं धोक्याचा इशारा दिला आहे. कोरोना संकटाबद्दल चर्चा करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं (डब्ल्यूएचओ) एक तातडीची बैठक बोलावली होती. कोरोनाचे नवे व्हेरिएंट पसरण्याचा धोका बैठकीत व्यक्त करण्यात आला. त्यामुळे महामारी रोखणं आणखी कठीण होईल, अशी भीती डब्ल्यूएचओनं व्यक्त केली आहे.
कोरोना महामारी अद्याप संपलेली नाही. संकट कायम आहे. कोरोनाचा विषाणू आणखी धोकादायक रुपात येऊ शकतो आणि तो जगभरात पसरू शकतो. त्यामुळे त्याला रोखणं आणखी अवघड आणि आव्हानात्मक होईल, असं डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन समितीनं एका निवेदनाच्या माध्यमातून सांगितलं आहे. त्यामुळे येत्या काळात कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे.
डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन समितीच्या बैठकीत कोरोना लसीकरण आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाबद्दलही चर्चा झाली. सध्याच्या घडीला अनेक देश लसीकरण न झालेल्या प्रवाशांना प्रवेश देत नाहीत. समितीनं याविरोधात आपलं मत व्यक्त केलं. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी कोविड-१९ लसीकरण प्रमाणपत्राची गरज नाही, या भूमिकेचा समितीनं पुनरुच्चार केला.
जागतिक पातळीवर पाहिल्यास अनेक देशांना अद्याप पुरेशा प्रमाणात कोरोना लसी मिळालेल्या नाहीत. कोरोना लसींच्या वितरणात मोठी असमानता आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय प्रवासांसाठी केवळ लसीकरणाची अट ठेवणं योग्य होणार नाही, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं. आंतरराष्ट्रीय प्रवासांसाठी लसीकरण प्रमाणपत्र अनिवार्य केल्यास असमानता आणखी वाढेल. नागरिकांच्या प्रवासावरील असमानतेत यात भर पडेल, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली.
Leave A Reply

Your email address will not be published.