राज्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण सापडू लागले

0

मुंबई : राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत असल्याने राज्य सरकारने २ एप्रिल अर्थात पाडव्यापासून राज्यातील सर्व प्रकारचे निर्बंध उठवले आहेत. राज्यातलं जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलेलं असतानाच गेल्या दोन दिवसांत रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना यासंदर्भात सूचक विधान केलं आहे.

गेल्या दोन दिवसांत राज्यात अचानक कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सोमवारी महाराष्ट्रात ५९ रुग्ण आढळल्यानंतर मंगळवारी त्यात दुपटीहून अधिक म्हणजेच १३७ नवे कोरोनाबाधित वाढले आहेत. देशभरात २४ तासांत १२४७ रुग्ण वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे. ही चौथी लाट असल्याची देखील भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वाढत्या रुग्णसंख्येवर सविस्तर भूमिका मांडली आहे.

एकाच दिवसात दुपटीहून जास्त रुग्ण वाढले असले, तरी घाबरण्याचं कारण नसल्याचं राजेश टोपे म्हणाले आहेत. “केंद्रानं दिलेल्या पत्रात काही राज्यांचा उल्लेख केला आहे. काल मी घेतलेल्या आढाव्यात महाराष्ट्रात एकूण १३५ केसेस आढळल्या आहेत. त्यात मुंबईमध्ये ८५ केसेस आहेत. महाराष्ट्राने ६० हजार केसेस रोज पाहिल्या आहेत. त्यामुळे अतिशय नियंत्रित अशी ही परिस्थिती आहे. कुठेही घाबरण्याचं कारण नाहीये. लसीकरणाचं प्रमाण देखील चांगलं झालं आहे”, असं राजेश टोपे म्हणाले.

दरम्यान, राजेश टोपेंनी सर्वांनी लसीकरण करून घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, ज्येष्ठ नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचा देखील सल्ला त्यांनी दिला आहे. “१२ ते १८ वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाला देखील आम्ही प्रोत्साहन देतोय. त्यासाठी जनजागृती करतो आहोत. लसीकरण स्वत:च्या सुरक्षेसाठी महत्त्वाचं आहे. बूस्टर डोससंदर्भात केंद्र सरकारने तसे निर्देश दिले आहेत. लोकांनी खासगी केंद्रात शुल्क देऊन बूस्टर डोस घ्यायला हरकत नाही. पण आज काळजीचा विषय नाही. आपण निर्बंध मुक्त केले आहेत. मास्कसक्ती हटवली आहे. पण ज्येष्ठ नागरिक किंवा सहव्याधी असणाऱ्या व्यक्तींनी गर्दीत मास्क घालण्याची काळजी घ्यावी”, असं ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.