नवी दिल्ली ः सीरमच्या ‘कोविशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सीन’ या दोन लसींना आपतकालीन वापरासाठी भारताच्या औषध महानियंत्रकांनी रविवारी परवानगी दिल्यामुळे लवकरच लसीकरण मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे. याबद्दल बोलताना औषध महानियंत्रक डाॅ. व्ही. जी. सोमाणी म्हणाले की, “लशी ११० टक्के सुरक्षित आहेत, परंतु त्यांच्या सुरक्षिततेबद्दल थोडीशी शंका निर्माण झाली तरी आम्ही त्यांना मंजुरी देणार नाही. तसेच कोव्हिशिल्ड ७०.४२ टक्के परिणामकारक, तर कोव्हॅक्सिन सुरक्षित असून उत्तम प्रतिकारशक्ती निर्माण करते”, असेही डाॅ. सोमाणी यांनी स्पष्ट केले.
औषध महानियंत्रक सोमाणी म्हणाले की, “सीरम आणि भारत बायोटेक यांच्या लशींना तज्ज्ञ समितीच्या अहवालाआधारे परवानगी देण्यात आली आहे. लशी दोन मात्रेत द्यायच्या असून त्या २ ते ८ अंश तापमानात साठवून ठेवता येतील. पुण्यातील सीरम इन्स्टिटय़ूटने चिंपाझीमधील सर्दीच्या विषाणूचा वाहक म्हणून उपयोग करून ‘कोव्हिशिल्ड’ लस तयार केली आहे. त्यासाठी संस्थेने अॅस्ट्राझेनेका ऑक्सफर्ड विद्यापीठ यांचे तंत्रसाहाय्य घेतले आहे. लस सुरक्षित आणि परिणामकारक असल्याची माहिती सादर करण्यात आली असून २३,७४५ जणांवर या लशीची चाचणी घेण्यात आली. ते सर्वजण १८ आणि त्याहून जास्त वयाचे होते”,अशा माहिती डाॅ. सोमाणी यांनी दिली.
“भारत बायोटेकच्या लशीमध्ये ‘होल व्हिरियॉन’ हा निष्क्रिय विषाणू वाहक म्हणून वापरला आहे. भारतीय वैद्यक संशोधन परिषद आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था यांच्या मदतीने ही लस तयार केली आहे. व्हेरो सेल प्लॅटफॉर्मवर ही लस तयार केली असून ती सुरक्षित आणि कार्यक्षम आहे. संस्थेने प्राण्यांवर प्रयोगाची माहिती सादर केली असून त्यात उंदीर, घुशी, ससे, सिरियन हॅमस्टर यांच्यावर प्रयोग करण्यात आले होते. त्यात ऱ्हिसस माकडांचा आणि हॅमस्टर्सचा समावेश आहे. ही माहिती भारत बायोटेकने ‘सीडीएससीओ’ला दिली होती. या लशीच्या टप्पा १ व टप्पा २ मधील वैद्यकीय चाचण्या ८०० जणांवर करण्यात आल्या होत्या. त्याचे परिणाम सुरक्षित असून चांगली प्रतिकारशक्ती तयार होण्यास मदत झाली आहे. या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू करण्यात आल्या असून २५,८०० स्वयंसेवक त्यात आहेत. एकूण २२,५०० जणांना ही लस देण्यात आली. ती सुरक्षित आहे. तज्ज्ञ समितीने कंपनीने दिलेल्या माहितीच्या आधारे या लशीला मंजुरी देण्याची शिफारस केली होती”, असे सविस्तर स्पष्टीकरण कोव्हॅक्सिन’बाबत डाॅ. सोमाणी यांनी दिली.