दिल्ली : देशात कोरोनाला रोखण्यासाठी वेगाने लसीकरण करण्यावर भर दिला आहे. त्यातच आता कोरोना लस अधिक स्वस्त दरात उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर चर्चाही केली असल्याचे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले. त्यामुळे येणा-या काळात लस आणखी स्वस्त दरात मिळू शकते.
सध्या देशात कुठल्याही राज्यात कोरोना लसीचा तुटवडा नाही, असे सांगत आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी लसीची किंमत कमी करण्याबाबत कंपन्यांसोबत पुन्हा चर्चा करण्यात येत आहे. आम्ही सांगितलेली किंमत ही लक्षणीयरित्या कमी आहे, असे म्हटले. सीरम इन्स्टिट्यूटची कोरोनावरील कोविशिल्ड ही लस आता २०० रुपयांहून कमी किमतीत मिळेल. सर्व कर वगळून एका डोसची किंमत २०० रुपयांहून कमी असेल, ते म्हणाले. खासगी रुग्णालयात मात्र लसीचा एक डोस सध्या २५० रुपयांना दिला जात आहे, तर सरकार सीरमकडून कोविशिल्ड लसीचा एक डोस सर्व कर वगळता १५० रुपयांहून कमी किमतीत घेणार असल्याचे आरोग्य मंत्रालयातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
कोरोना लस बनविणारी जगातील सर्वांत मोठी कंपनी म्हणून सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची ओळख आहे. ही कंपनी अॅस्ट्रा झेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वतीने विकसित केलेल्या कोविशिल्डचे उत्पादन करीत आहे. विदेशातही या लसीला मागणी असून, अनेक देशांत या लसीच्या माध्यमातून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. भारत सरकारनेही कोविशिल्डच्या १ कोटी लसी खरेदी करण्याची तयारी केली आहे. मात्र, लस स्वस्त दरात उपलब्ध करून द्याव्यात, यासाठी सरकार प्रयत्न करीत असल्याचे भूषण म्हणाले.