लाचखोर पोलिसांना 10 मार्चपर्यत पोलिस कोठडी
जामीन मिळवून देण्यासाठी मागितले होते पाच लाख रुपये, एक लाख स्वीकारताना अटक
पुणे : न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचा जामीन करण्यासाठी ५ लाखाच्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व एका कर्मचाऱ्याला
न्यायालयाने 10 मार्च पर्यत पोलिस कोठडी सुनावणी आहे.
पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम व पोलीस कर्मचारी महेश दौंडकर अशी कोठडी झालेल्या पोलिसांची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना शनिवारी एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले होते. ही कारवाई शनिवारी दुपारी सव्वातीन वाजता कामशेत पोलीस स्टेशनमध्ये झाली.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक बाळासाहेब नेवाळे यांना 21 फेब्रुवारी रोजी फसवणूक प्रकरणी अटक झाली आहे. त्यांना वडगाव मावळ न्यायालयाने सुरुवातिला 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
वडगाव मावळ न्यायालयात जामीनसाठी मदत करण्यासाठी पोलिसांनी पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानुसार तक्रारदार यांनी 23 फेब्रुवारी रोजी अडीच लाख रुपये दिले. मात्र पोलिसानी जामीन मिळवून देण्यासाठी काहीच मदत केली नाही. नेवाळे यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली.
त्यांची येरवडा पुणे कारागृहात रवानगी केली. नेवाळे यांचा जामीन करण्यासाठी चौधरी, कदम आणि दौंडकर यांनी काहीच मदत न केल्याने त्यांना उर्वरित रक्कम देण्याचे टाळले होते. नेवाळे यांचा 10 फेब्रुवारी रोजी जामीन असल्याने मदत करतो, असे म्हणून उर्वरित एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती, असे तक्रारीत नमूद आहे.
याबाबत तक्रारदार मावळ पंचायत समितीचे उप सभापती दत्तात्रय शेवाळे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयात तक्रार दिली. त्यानुसार शनिवारी रोख रक्कम एक लाख रुपये स्वीकारताना पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम व कर्मचारी महेश दौंडकर यांना अटक केली. त्यांची पाच तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर कामशेत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीला अटक करून रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास करण्यासाठी संबंधित आरोपी पोलिसांना पोलीस कोठडी देण्यात यावी असा युक्तिवाद सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी केला. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने तीनही आरोपी पोलिसांची दहा मार्चपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.