भ्रष्टाचार प्रकरण ! अनिल देशमुखांचा जामीन अर्ज सीबीआय न्यायालयाने फेटाळला

0

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळला आहे. सध्या तुरुंगात असलेल्या देशमुख यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. देशमुख यांचे सहकारी कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांचाही जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.

अनिल देशमुख यांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटले की, सीबीआयने 60 दिवसांच्या अनिवार्य कालावधीत आरोपपत्र दाखल केले नाही आणि नंतर सीबीआयने अपूर्ण आरोपपत्र दाखल केले. तसेच सीबीआयने आरोपपत्रासह संबंधित कागदपत्रे सादर केली नसून ती निर्धारित मुदतीनंतर सादर करण्यात आली, या कारणास्तव या तिघांनी न्यायालयाकडे जामीन मागितला होता. परंतु, सीबीआयने या युक्तिवादांना विरोध करत विहित मुदतीत आरोपपत्र दाखल केल्याचे म्हटले.

फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 173 अन्वये आरोपीला अटक केल्यापासून 60 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करावे लागते. मात्र, जर 60 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल झाले नाही, तर आरोपींना डिफॉल्ट जामीन मिळू शकतो.

100 कोटी रुपयांच्या वसूलीचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर केला होता.
या आरोपाखाली सीबीआयने गेल्या महिन्यात देशमुखांवर आरोपपत्र दाखल केले होते.

मुंबई शहरातील रेस्टॉरंट्स आणि बारमधून दरमहा 100 कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट गेल्या वर्षी मार्चमध्ये देशमुख यांनी पोलीस अधिकार्‍यांना दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.