मुंबई : विधान परिषदेच्या नाशिक आणि अमरावती पदवीधर तसेच औरंगाबाद, नागपूर तसेच कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज, गुरुवारी होऊन निकाल जाहीर केले जातील. सत्ताधारी युती आणि विरोधी महाविकास आघाडीने विधान परिषदेच्या पाच जागांवर जोर लावला होता.
त्यामुळे या निवडणुकीच्या निकालांकडे जनतेचे लक्ष लागले आहे. विधान परिषदेसाठी पसंती क्रमानुसार मतदान झाल्याने मतमोजणीच्या प्रक्रियेला वेळ लागून निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे गणित शेवटच्या क्षणी बिघडल्याने आघाडीला नाशिकच्या जागेची फारशी अपेक्षा नाही. येथे काँग्रेस उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी अर्जच दाखल केला नाही. पक्षाची नाचक्की झाल्याने काँग्रेसने तांबे पिता -पुत्रांवर निलंबनाची कारवाई केली. या कारवाईनंतर आघाडीला नाईलाजाने अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा द्यावा लागला. त्यामुळे नाशिकमध्ये सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील या दोन अपक्षांमध्येच लढत झाली. अमरावती पदवीधरमध्ये काँग्रेसने धीरज लिंगाडे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, त्यांची उमेदवारी दिल्लीतून जाहीर करण्यात आली नाही.
महाविकास आघाडीला औरंगाबाद आणि कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात यशाची अपेक्षा आहे. औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीचे विक्रम काळे आणि भाजपचे किरण पाटील यांच्यात चुरस आहे. कोकण शिक्षकांमध्ये विद्यमान आमदार बाळाराम पाटील आणि भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात चुरस आहे. कोकण शिक्षकची जागा मिळविण्यासाठी भाजपने जोर लावला आहे. नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात भाजपने नागोराव गाणार यांना पुरस्कृत केले आहे. तर महाविकास आघाडीने सुधाकर आडबाले यांना पाठिंबा दिला आहे. येथे भाजपला गाणार यांच्या विजयाची खात्री वाटत आहे.
अशी होणार मतमोजणी
• विधान परिषद निवडणुकीत प्रत्यक्ष मतदानाच्या आकडेवारीनुसार पहिल्या पसंतीची किती मते आवश्यक आहेत हे निश्चित करण्यात येईल.
• त्यानुसार पहिल्या पसंतीची तेवढी मते मिळाल्यास उमेदवाराला विजयी घोषित केले जाईल.
• पहिल्या पसंतीची आवश्यक मते कोणत्याच उमेदवाराला मिळाली नाहीत तर सर्वात कमी मते मिळालेल्या उमेदवाराची दुसऱ्या पसंतीची मते मोजली जातील.
• या उलट्या क्रमाने उमेदवारांची दुसऱ्या पसंतीची मते मोजण्यात येतील.
• सर्व मतांची मोजणी झाल्यानंतरही पुन्हा आवश्यक मते मिळाली नाहीत तर सर्वाधिक मते मिळालेल्या उमेदवाराला विजयी घोषित केले जाते.
मतदारसंघनिहाय झालेले मतदान
• कोकण शिक्षक – ९१.०२ टक्के
• औरंगाबाद शिक्षक – ८६ टक्के
• नागपूर शिक्षक – ८६.२३ टक्के
• नाशिक पदवीधर – ४९.२८ टक्के
• अमरावती पदवीधर – ४९. ६७ टक्के