पदवीधर आणि शिक्षकची आज मत मोजणी

0

मुंबई : मतमोजणीच्या किचकट प्रक्रियेमुळेच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील निकाल लागण्यास विलंब लागण्याची चिन्हे आहेत.

पुणे पदवीधर मतदारसंघात ६२ उमेदवार रिंगणात असल्याने या मतदारसंघात कोणत्याही उमेदवाराने पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण न केल्यास निश्चित मतांचा कोटा पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या, तिसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करावी लागेल. यात सर्वात कमी मते मिळणारे उमेदवार उतरत्या क्रमाने एकापाठोपाठ बाद होतील. ही सारीच किचकट प्रक्रिया आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांत यंदा विक्रमी मतदान झाल्याने साऱ्याच उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

अशी होणार मतमोजणी

* सर्व मतपत्रिका एकत्र केल्या जातात.

* त्यातून बाद मतपत्रिका बाजूला काढल्या जातात.

* वैध मतपत्रिकांची मोजणी केली जाते.

* वैध मतपत्रिकांच्या आधारे पहिल्या पसंतीची किती मते आवश्यक आहेत याचा कोटा निश्चित केला जातो. या सर्व पक्रियेला बराच वेळ लागतो.

* वैध मतपत्रिकांच्या संख्येला दोनने भागून त्यात १ अधिक केला जातो. उदा. १०० वैध मते असल्यास त्याला दोनने भागून (१०० भागीले दोन = ५० अधिक १ अधिक म्हणजे ५१ मतांचा कोटा येतो.)

* या सूत्रानुसार उमेदवाराला पहिल्या पसंतीची ५१ मते किंवा ५१ टक्के मते मिळाल्यास त्याला विजयी घोषित केले जाते.

* निश्चित केलेल्या कोटय़ाएवढी मते कोणत्याही उमेदवाराला मिळाली नाही तर बाद पद्धतीने मते मोजली जातात.

* पुणे पदवीधरमध्ये ६२ उमेदवार रिंगणात आहेत. समजा कोणत्याही उमेदवाराला पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण करता आला नाही तर दुसऱ्या, तिसऱ्या पसंतीची मते मोजली जातील.

* अशा वेळी ६२व्या क्रमांकावरील उमेदवार सर्वात आधी बाद होतो, पण त्याच्या दुसऱ्या पसंतीची मते मोजली जातात. मताचे मूल्य एक एवढे असते.

* या उतरत्या क्रमाने ६२, ६१, ६०, ५९.. असे एकापाठोपाठ एक उमेदवार बाद होत जातात.

* या प्रक्रियेत मतांचा कोटा कोणत्याही उमेदवाराने पूर्ण केल्यास त्याला विजयी घोषित केले जाते.

* सर्व मते मोजल्यावर कोणत्याही उमेदवाराला कोटय़ाएवढी मते मिळाली नाही तर सर्वाधिक मते मिळणाऱ्या उमेदवाराला विजयी म्हणून घोषित केले जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.