पुणे : गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करुन परदेशात पळ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या सोमजी दाम्पत्याला दिल्ली विमानतळावरून अटक करण्यात आली.
अलनेश अकील सोमजी आणि डिम्पल अलनेश सोमजी (रा. कोरेगाव पार्क) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहे. याप्रकरणी योगेश विष्णू दीक्षित (41) यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, वार्षिक 24 टक्के परतावा देण्याचे आमिष आरोपीने दाखवले होते. त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांच्याकडे 66 लाख 90 हजार रुपये गुंतवले होते. यातील काही रक्कम आरोपींनी परतही दिली होती. तर आणखी काहींची मिळून 3 कोटी 37 लाख 48 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर अलनेश सोमजी आणि डिंपल सोमजी तपासात सहकार्य करीत नसल्याने यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ते फरार झाले होते. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध लुकआऊट नोटीस बजावण्यात आली होती. दरम्यान दिल्ली विमानतळावरून ते श्रीलंकेला जाण्यासाठी आले होते. याची माहिती पुणे पोलिसांना मिळाल्यानंतर पुणे पोलिसांच्या एका पथकाने सोमवारी दुपारी या दोघांनाही ताब्यात घेतले आहे.