‘सीरम’ची कोव्हीशिल्ड लस सर्व प्रथम भारतीयांना

0

पुणे : पुण्यातील सीरम इन्स्टिटय़ूटमध्ये दर महिन्याला करोना प्रतिबंधक कोव्हीशिल्ड लशीच्या दहा कोटी मात्रा (डोस) तयार करण्यात येणार आहे. ही लस सर्वात आधी भारतीयांनाच देण्यात येईल, अशी ग्वाही ‘सीरम इन्स्टिटय़ूट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी शनिवारी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सीरम इन्स्टिटय़ूटला भेट देऊन लस निर्मितीच्या प्रक्रियेचा आढावा घेतला. त्यानंतर पूनावाला यांनी पत्रकार परिषदेत लशीच्या निर्मितीबाबत माहिती दिली. पूनावाला म्हणाले, ‘‘सीरम सध्या दर महिन्याला लशीच्या ५ ते ६ कोटी मात्रा तयार करत आहे, जानेवारीपासून ही प्रक्रिया अधिक वेगवान होईल आणि प्रतिमहिना दहा कोटी मात्रा तयार केल्या जातील.’’

लशीच्या युरोप आणि अमेरिकेतील वितरणाची जबाबदारी अ‍ॅस्ट्राझेनेका ही कंपनी पार पाडणार असल्यामुळे सीरमचे प्राधान्य भारत आणि कोव्हॅक्स देशांतील वितरणाला असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी किं वा भारत सरकार यांच्याशी कोणताही लिखित करार झालेला नाही, मात्र जुलैपर्यंत तीन ते चार कोटी डोस भारत सरकार खरेदी करेल, अशी शक्यता पुनावाला यांनी वर्तवली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीमध्ये लसनिर्मितीची प्रक्रिया, त्याची साठवणूक आणि वितरण, त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा आणि जागतिक स्तरावर उपलब्ध असलेल्या लशींचे संभाव्य फायदे आणि तोटे यांबाबत चर्चा झाल्याचे पूनावाला यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.