मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी कोरोना लढ्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. या दोघांनी ७ कोटी रुपये गोळा करण्याचे लक्ष्य ठेवले असताना ११ कोटी इतकी रक्कम जमा केली आहे.
केटो या संस्थेच्या माध्यमातून विराट आणि अनुष्का यांनी सात कोटी गोळा करण्याचे लक्ष्य ठेवले होते. यात स्वत: विराट आणि अनुष्का यांनी दोन कोटींचा निधी दिला होता. त्यानंतर देश विदेशातील अनेक व्यक्ती आणि संस्थांना यात सहाय्य केले होते.
या मदत निधीत एमपीएल स्पोटर्स फाउंडेशनने ५ कोटी इतकी रक्कम दिली. त्यामुळे ७ कोटींचे लक्ष्य सहजपणे पार झाले. MPLने दिलेल्या मदतीवर विराटने ट्विट केले आहे. करोना विरुद्धच्या लढाईत पाच कोटीची मदत दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद. यासह या मदत निधीचे लक्ष्य ११ कोटी इतके करण्यात येत आहे. तुम्ही सर्वांनी केलेल्या मदतीसाठी मी आणि अनुष्का आभार व्यक्त करतो.
विशेष म्हणजे विराट आणि अनुष्का यांनी नव्याने ठेवलेले ११ कोटींचे लक्ष्य देखील पार झाले आहे आणि यासाठी अद्याप एक दिवसाचा वेळ शिल्लक आहे.
विराट प्रमाणेच अन्य भारतीय क्रिकेटपटूंनी करोनाच्या लढ्यात मदत केली आहे. यात सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, पंड्या बंधू आदींचा समावेश आहे. तर ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिंन्स आणि माजी जलद गोलंदाज ब्रेट ली यांनी देखील मदत केली. आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सने ७.५ कोटी, सनरायझर्स हैदराबादने ३० कोटी तर चेन्नई सुपर किंग्जने तामिळनाडू सरकारला ४५० ऑक्सिजन संच दिले आहेत.