पिंपरी : गर्भपाताच्या गोळ्या एका महिला डॉक्टरने दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरी-चिंचवड पालिकेकडे आलेल्या तक्रारीवरून पालिकेच्या वैद्यकीय विभागाने दवाखान्यावर छापा टाकून हा प्रकार ४ तारखेला उजेडात आला. त्याबाबत भोसरी पोलिस ठाण्यात वैद्यकीय गर्भावस्था समाप्ती कायदा,१९७१ नुसार गुरुवारी (ता. १०) गुन्हा दाखल करण्यात आला.
शनिमंदिराजवळ,गव्हाणेवस्ती, भोसरी येथील शीतल क्लिनिकमध्ये हा गैरप्रकार सुरु होता.याबाबत पालिकेचे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे (५७,रा. पिंपळे सौदागर) यांनी फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार डॉ.शीतल प्रशांत येवले-बोऱ्हाडे (रा.शनि मंदिराजवळ,गव्हाणेवस्ती,भोसरी)यांच्याविरुद्ध वरील कायदा तसेच भादंवि कलम १८८ नुसारही गुन्हा गुरुवारी नोंदविण्यात आला आहे.
या गुन्ह्यात दोन ते सात वर्षे शिक्षेची तरतूद आहे. त्यातील आरोपीला अद्याप अटक केली नसल्याचे भोसरी पोलिस ठाण्यचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम यांनी सांगितले.