पुणे : राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात ट्विटर खात्याद्वारे बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी दोघाविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी बारामतीचे उपनगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचेपदाधिकारी असलेल्या अभिजित जाधव यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.२३) जाधव यांचे मित्र अजित कदम (रा. जळोची, बारामती) यांना शरद पवारयांच्याविषयी वेदश्री नावाच्या एका मुलीने बदनामीकारक मजकूर लिहिला असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ही बाब त्यांनी अभिजित यांच्या लक्षात आणून दिली.
पवारांच्या छायाचित्रासह प्रसिद्ध केलेल्या या ट्विटला राजे हर्षवर्धन नामक खातेधारकाने दिलेल्या प्रतिक्रियेतही पवार यांच्याबद्दल बदनामी केल्याचे जाधव यांना सांगितले. या प्रकारची गंभीर दखल घेत जाधव यांनी बदनामी करणाऱ्या दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.