गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वाहन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या
13 बुलेट आणि दोन अन्य महागड्या दुचाकी हस्तगत
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी बुलेट चोरी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 20 लाख 50 हजारांच्या 13 बुलेट आणि दोन अन्य महागड्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
विशाल बाळासाहेब मगर (20, रा. लेहणेवाडी, ता जामखेड, जि. अहमदनगर), विशाल बंकट खैरे (21, रा. भुतडाता. जामखेड, जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा मुख्य साथीदार अमोल शिवाजी ढोबळे (रा. घाटकोपर, मुंबई) याचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी वाहन चोरांची माहिती काढली. सीसीटीव्ही फुटेज व घटनास्थळावरील तांत्रिक विश्लेषण करुन त्यामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल शिवाजी ढोबळे हा बुलेट मोटर सायकल चोरी करीत असल्याचे आढळले. अमोल याने चोरलेली एक बुलेट दुचाकी विकण्यासाठी त्याचे दोन साथीदार मोशी टोलनाका परीसरामध्ये येणार आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी रविवारी (दि. 24) पोलिसांनी मोशी टोलनाक्यावर सापळा लावला. पोलिसांनी आरोपी मगर आणि खैरे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर अनेक गुन्हे उघडकीस आले. अमोल ढोबळे याने 12 बुलेट मोटर सायकल व इतर दोन मोटर सायकल जामखेड येथे विक्रीकरीता ठेवल्याचेही आरोपींनी पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा, नवी मुंबई, ठाणे परीसरातून चोरुन आणून विक्रीसाठी ठेवलेल्या 13 बुलेट मोटर सायकल व एक अपाची मोटर सायकल, एक अॅक्टीवा मोपेड अशा एकूण 20 लाख 50 हजार रुपये किमतीच्या 15 मोटर सायकली हस्तगत केल्या आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) आर. आर. पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर, पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न ज-हाड, पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले, हजरत पठाण, यदु आढारी, सचिन मोरे, विठठल सानप गंगाधर चव्हाण, योगेश्वर कोळेकर, नाथा केकान, राजकुमार हनमंते, सागर जैनक, त्रिनयन बाळसराफ, शशिकांत नांगरे, राहुल सुर्यवंशी, प्रमोद ढाकणे, जगदीश बुधवंत, गजानन आगलावे यांनी केली आहे.