पिंपरी : जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल केलेल्या कोरोना बाधित रुग्णांचे साहित्य, मौल्यवान वस्तू चोरीला जात आहेत. रुग्णांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वस्तू नातेवाईकांना मिळत नाहीत. नेहरूनगर जम्बो कोविड सेंटरमध्ये घडलेले दोन प्रकार उघडकीस आले आहेत. याबाबत बुधवारी (दि. 5) पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या प्रकरणात वैष्णवी ज्योतिबा खुळे (20, रा. पिंपळे निलख) यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी खुळे यांचे मामा प्रशांत विश्वनाथ मोरे (40, मरकळ रोड, आळंदी) यांना कोरोनाची लागण झाल्याने 25 एप्रिल रोजी नेहरूनगर येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
उपचारादरम्यान प्रशांत मोरे यांचा 1 मे रोजी मृत्यू झाला. मोरे यांच्यासोबत असलेला त्यांचा 10 हजारांचा मोबाईल फोन त्यांच्या नातेवाईकांना मिळाला नाही. जम्बो कोविड सेंटर मधून अज्ञात व्यक्तीने त्यांचा मोबाईल फोन चोरला असल्याची फिर्याद देण्यात आली आहे.
नेहरूनगर येथील जम्बो कोविड सेंटर मध्ये आणखी एक चोरीची घटना उघडकीस आली आहे. त्या प्रकरणात सागर दिवाकर गुजर (वय 35, रा. बोपखेल) यांनी अज्ञाताच्या विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या आई शीतल दिवाकर गुजर (वय 61) यांना 14 एप्रिल रोजी कोरोनावरील उपचारासाठी नेहरूनगर जम्बो कोविड सेंटर मध्ये दाखल करण्यात आले. 19 एप्रिल रोजी फिर्यादी यांच्या आईचे उपचारादरम्यान निधन झाले.
शीतल गुजर यांच्या अंगावर असलेले मंगळसूत्र, कानातील फुल, सोन्याची अंगठी, दोन चांदीच्या अंगठ्या असा एकूण 41 हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.