पुणे: नववर्षांचे स्वागत करताना पुणेकरांनी संयम आणि शांततेचे दर्शन घडविले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ड्रंक अॅण्ड ड्राईव्हचे प्रमाण तिपटीने घटल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. थर्टी फस्टला मद्यपान करून वाहन चालविणा-या १३२ जणांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला. पोलिसांच्या आवाहनानुसार नागरिकांनी घरातच थर्टी फस्ट साजरा केला. त्यामुळे इतर कारवाईही कमी झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
पुणेकरांनी नववर्षांचे स्वागत करताना संयम ठेवून आनंद साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार काल मध्यरात्री अकरा वाजेनंतर शहरातील बहुतांश रस्त्यावर नागरिक दिसून आले नाही. दरवर्षी नववर्षांचे स्वागत करताना फग्र्युसन रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, एम. जे रस्ता, कॅम्प, कोरेगाव पार्कसह ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर जल्लोष करताना तरूणाई दिसून येते. यंदा मात्र, कोरोनाचे संकट असल्यामुळे नागरिकांनी घरातच कुटूंबियासमवेत आनंद साजरा करण्याच्या आवाहनाला अनेकांनी दाद दिली. त्यामुळे रात्री बारा वाजेच्या आतमध्ये रस्ते सुनसान झाल्याचे दिसून आले.
शहरात नागरिकांकडून गर्दी, गोंधळ, गोंगाट, आरडा-ओरड न केल्यामुळे शांतता होती. संचारबंदी असल्यामुळे रात्री अकरानंतर पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती. त्यामुळे नागरिकांच्या गर्दीला आळा बसला होता. नाकाबंदी वाहन तपासणी करण्यात येत होती. त्यामध्ये विना हेल्मेट, विना लायसेन्स, विना मास्क चालकांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला. विशेषतः ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह मद्यपान करून वाहन चालविणा-या १३२ जणांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. गेल्यावर्षी थर्टी फस्टला ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह करणा-या ४६० जणांविरूद्ध कारवाई करण्यात आली होती.