गुन्हेगाराचा पोलीस चौकीतच आत्महत्येचा प्रयत्न

0

पुणे : सराईत गुन्हेगाराने दारुच्या नशेत पोलीस चौकीत येऊन खिडकीच्या काचा हाताने फोडल्या असून त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. वारजे पोलीस चौकीत झालेल्या या खळबळजनक प्रकाराबद्दल पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

मंगेश विजय जडीतकर (२१, रा. पारुदत्त कॉम्प्लेक्स, दांगट पाटील नगर, वारजे) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव असून त्याच्यावर मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे.

मंगेश जडीतकर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. वारजे माळवाडीत एका टेम्पोचालकाला कोयत्याचा धाक दाखवून लुटल्याप्रकरणी वारजे पोलिसांनी मंगेश जडीतकर व त्याचा साथीदार गौरव पासलकर या दोघांना मार्चमध्ये अटक केली होती.

त्यानंतर तो सध्या जामीनावर सुटला होता. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जनार्धन होळकर यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंगेश जडीतकर हा शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दारुच्या नशेत वारजे पोलीस चौकात आला होता.

त्याने तेथे येऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करुन “माझी तक्रार घ्या मला ओळखत नाही का मी गुन्हेगार आहे. मला मंगेश् जडीतकर म्हणतात, मी आता जीव देतो,” असे म्हणू लागला. तेव्हा होळकर यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असताना त्याने पोलीस चौकीच्या खिडकीच्या काचा हाताने फोडल्या. त्यात तो जखमी झाला.

चौकीसमोर मार्शल ड्युटी करणारे पोलीस शिपाई काटे यांच्या मोटारसायकलच्या स्पीडो मीटरच्या काचेवर धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला पोलिसांनी तातडीने मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक अमृत मराठे तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.