मुंबई : “मेंढपाळाने छान व्यवस्था केली. ही व्यवस्था म्हणजेच आनंद, सुख मानण्याची गोष्ट नाही. सरकारला शेळ्यांची व्यवस्था करायची आहे व त्या व्यवस्थेवर शेळ्या खूश असतील तर तो त्यांचा प्रश्न, पण इतरांनीही शेळ्या-मेंढ्या व्हावं हा त्यांचा आग्रह चुकीचा आहे. वाघ, लांडगे, हत्ती, सिंह यांनीही शेळ्या-मेंढ्यांसारखे बॅss बॅss करावे व कोणी गर्जना केली तर तो अपमान, ही लोकशाही नाही. यालाच लोकशाही म्हणावे, असा दबाव टाकणाऱ्यांना लोकशाही शिकवायची गरज आहे”, अशी टीका शिवसेनेनं सामनाच्या अग्रेलखातून मोदी सरकारवर केली आहे.
शेतकरी आंदोलनच्या समर्थनार्थ काॅंग्रेसचे नेते राहूल गांधी राष्ट्रपतींना भेटण्यासाठी गेले, त्यानंतर मोदींनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यावरून सामनाच्या अग्रेलखातून मोदी सरकरावर निशाणा साधला आहे. “मोदी हे ‘मन की बात’मधून आकाशवाणी करतात. म्हणजे त्यांना मनदेखील आहे. मोदी यांनी आता त्यांचे नवे दुःख लोकांसमोर मांडले आहे. दिल्लीतील काही लोक मला सतत टोमणे मारत असतात व माझा अपमान करतात. त्यांना मला लोकशाहीचे धडे द्यायचे आहेत, असे मोदी यांनी सांगितले आहे हे धक्कादायक आहे. आपल्या पंतप्रधानांचा अपमान कोण करीत आहे? पंतप्रधानांचा अपमान करण्याइतका प्रबळ विरोधी पक्ष विद्यमान राज्यकर्त्यांनी शिल्लक ठेवला आहे काय? काँग्रेसच्या सध्याच्या नेतृत्वास आपण गांभीर्याने घेत नसल्याचे भाजप पुढाऱ्यांनी एका बाजूला सांगायचे व त्याचवेळी राहुल गांधी आमचा अपमान करतात, असे दुसऱ्या तोंडाने बोलायचे हे पांचट विनोदाचे लक्षण आहे. विधायक टीका करणे, सरकारच्या खोटेपणावर बोलणे यास राज्यकर्ते अपमान म्हणत असतील तर लोकशाहीचा अंतकाळ जवळ आला आहे”, अशी टीका शिवसेनेनं केली आहे.
“मोदी हे जागतिक स्तरावरील मोठे नेते आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनी मारलेल्या टोमण्यांची दखल घेण्याची त्यांना गरज नाही. राहुल गांधी यांना गेल्या सहा वर्षांत या मंडळींनी मारलेले टोमणे एकत्र केले तर मोठे ग्रंथ निर्माण होतील. राहुल गांधींचा उल्लेख ‘पप्पू’ असा करणाऱ्यांनी दुसऱ्यांनी मारलेल्या टोमण्यांची धास्ती का बाळगावी? पश्चिम बंगालात ममता बॅनर्जी यांच्यासंदर्भात ज्या भाषेचा वापर सध्या सुरू आहे, त्यास काय म्हणावे? शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांवरही अधूनमधून टोमणेबाजी सुरूच असते. राजकारणात दोन द्यावे आणि दोन घ्यावेत. भाजपाची ताकद मोठी असल्याने तुम्ही चार द्यावेत. पण कधीतरी दोन घ्यावेच लागतील आणि सत्ताधाऱ्यांनी याची तयारी ठेवायलाच हवी. मोदी सरकारचे भाग्य असे की, आज विरोधी बाकावर मधु लिमये, मधु दंडवते, लोहिया, जनेश्वर मिश्र नाहीत. चंद्रशेखर, इतकेच काय लालू यादव, येचुरीदेखील नाहीत. नाहीतर टोले आणि टोमणे म्हणजे काय याचा प्रत्यय आलाच असता. राज्य मिळाले आहे ते नीट चालवा! शेळ्यांवर राज्य करणे सोपे असते”, अशी सडेतोड टीका शिवसेनेनं केलेली आहे.