घरफोड्या करणाऱ्या ‘सीएम’ टोळीला लगाम

0

पिंपरी : शहरात घरफोड्या करणाऱ्या सीएम टोळीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने लगाम घातला आहे. या टोळीकडून तब्बल ३८१ ग्रॅम सोन्याचे दागिने, एक किलो चांदीचे दागिने आणि अन्य साहित्य, असा एकूण १९ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे.

चंद्रकांत ऊर्फ सीएम अनंत माने (२०, रा.मोरया हाऊसिंग सोसायटी, वेताळ नगर, चिंचवड), राजु शंभु देवनाथ ऊर्फ राजू बंगाली (२०, रा. वेताळ नगर, चिंचवड), राम ऊर्फ रामजाने लक्ष्मण क्षिरसागर (२६, रा मू.पो. वाधोली गौर, ता. कळंब, जि. उस्मानाबाद), अमोल ऊर्फ भेळया अरुण माळी ऊर्फ घुगे (२७, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस हवालदार नारायण जाधव आणि व पोलीस नाईक लक्ष्मण आढारी यांना माहिती मिळाली की, पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार असलेला सराईत घरफोड्या करणारा आरोपी चंद्रकांत ऊर्फ सीएम हा त्याच्या साथीदारांसोबत उस्मानाबादमधील कळंब तालुक्यातील वाघोली गौर येथे लपून बसला आहे. त्यानुसार पोलिसांनी उस्मानाबाद जिल्ह्यातून चार जणांना ताब्यात घेतले.

या टोळीकडे चौकशी केली असता मागील तीन महिन्यांच्या कालावधीत टोळीने नऊ ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत. त्यामध्ये चोरीला गेलेले ३८१ ग्रॅम सोन्याचे, १ किलो चांदीचे आणि घरफोडीतील अन्य साहित्य, असा एकूण १९ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपींनी पुणे परिसरातील एका सराफाला साडेपाच लाखांचे १०९ ग्रॅम सोन्याचे दागिने विकले होते. त्या सराफाचा पोलीस शोध घेत आहेत. या कारवाईमुळे चिंचवड पोलीस ठाण्यातील दोन, निगडी चार, देहूरोड दोन आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यातील एक, असे एकूण नऊ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.