धुळे येथील ज्ञानेश पाटील (२३) या तरुणाने रविवारी रात्री गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रसंग त्याने फेसबुक लाइव्ह करीत सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ फेसबुकच्या आयर्लंड येथील मुख्यालयाने पाहून मुंबई सायबरच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांना कळवले. तसेच ज्ञानेशच्या फेसबुक पेज वरुन तीन मोबाइल क्रमांक दिले. सायबर पोलिसांनी या तरुणाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिन्ही मोबाइल बंद होते. करंदीकर यांनी दोन पथके तयार करत या तरुणाचा पत्ता शोधण्यासाठी धडपड सुरू केली. पथकातील सहायक निरीक्षक रवी नाळे यांनी अवघ्या १० मिनिटांत आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरुणांचे नाव आणि नेमका पत्ता शोधला.
सायबर पोलिसांनी हे तपशील महानिरीक्षक प्रताप दिघावकर, अधीक्षक पंडित यांना दिले व पुढल्या पाच मिनिटांत धुळे पोलिसांनी ज्ञानेशचे घर गाठले. धुळे सायबर पोलिसांना गळा कापलेल्या अवस्थेतील ज्ञानेश सापडला. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मुंबई सायबर पोलिसांनी नेमकी आणि वेळीच माहिती दिल्यामुळे त्याचे प्राण वाचले. ज्ञानेश याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती स्थिर आहे.