नागपूर : राज्यात सायबर गुन्हेगारी डोकेदुखी ठरत आहे. याचा फटका अनेक आयपीएस अधिकारी तसेच पोलिसांना बसलेला आहे. आता अश्याच प्रकारचा त्रास नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार कुमार यांना झाला आहे. अमितेशकुमार यांच्या बनावट फेसबुक अकाऊंटद्वारे अनेकांना फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविण्यात आल्याचे उशिरारात्री उघडकीस आले आहे.
गुरूवारी सायंकाळी अमितेशकुमार यांच्या नावाचे बनावट एफबी अकाऊंट उघडण्यात आले. त्याद्वारे अमितेशकुमार यांच्या ओळखीच्या ३२ जणांना ‘फ्रेण्ड रिक्वेस्ट’ पाठविण्यात आली. काहींनी ती ‘अॅक्सेप्ट’ केली. दरम्यान आधीच ‘फेसबुक फ्रेण्ड’ असताना पुन्हा ‘फ्रेण्ड रिक्वेस्ट’ आल्याने त्यांच्या काही मित्रांनी अमितेशकुमार यांच्याशी थेट संपर्क साधला.
आपण कोणत्याही प्रकारची ’फ्रेण्ड रिक्वेस्ट’ पाठविली नसल्याचे अमितेशकुमार यांनी त्यांना सांगितले. हा बनावटपणा उघडकीस येताच अमितेशकुमार यांनी लगेच सायबर सेलला याबाबत कळविले. बनावट अकाऊंट तयार करणाऱ्यांचा शोध घेण्याचे निर्देश दिले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत बोलण्याचे टाळले. उशिरारात्रीपर्यंत या बनावट फेसवुक अकाऊंटबाबत पोलिस दलात मात्र चर्चा सुरू होती.
यापुर्वी महराष्ट्र पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक यांना अश्या प्रकारचा फटका बसलेला आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनाही अश्याच प्रकारचा सायबर गुन्हेगारीचा फटका बसला होता. सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या बनावट आकाउंड वरुन पैश्यांची मागणी केली होती.