आयपीएस रश्मी शुक्ला यांना सायबर पोलिसांचे समन्स; होणार चौकशी

0

मुंबई : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या कथित बदल्याचे रॅकेट प्रकरणाचा गोपनीय अहवाल फोडल्याप्रकरणी तत्कालीन राज्य गुप्त वार्ता विभागाच्या प्रमुख व ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याकडे चौकशी केली जाणार आहे. मुंबई सायबर पोलिसांनी चौकशीला हजर राहण्यासाठी त्यांना सोमवारी नोटीस पाठविली आहे.

शुक्ला या सध्या प्रतिनियुक्तीवर केंद्रीय राखीव पोलीस दलात अप्पर पोलीस महासंचालक म्हणून हैदराबाद येथे कार्यरत आहेत. त्यांची येत्या बुधवारी चौकशी केली जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

अत्यंत गोपनीय समजला जाणारा फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल राज्याचे विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २३ मार्चला पत्रकार परिषदेत जाहीर करून महाविकास आघाडी सरकारचा कारभार भ्रष्ट असल्याचे सांगून टीका केली होती, तर सत्ताधारी नेत्यांनी संबंधित अहवाल पूर्णपणे खोटा असल्याचे सांगत रश्मी शुक्ला या भाजपच्या एजंट म्हणून काम करत असल्याचा आरोप केला होता. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याप्रकरणी तपास करून शुक्ला यांनी अधिकाराचा गैरवापर व सरकारची दिशाभूल करून फोन टॅपिंग करून बनविलेला अहवाल वस्तुस्थितीदर्शक नसल्याचे स्पष्ट केले होते. तो त्यांच्या कार्यालयातून उघड झाल्याचे स्पष्ट करून ऑफिशियल सिक्रेट ॲक्टचा भंग केल्याचेही नमूद केले होते.

राज्य गुप्त वार्ता विभागाच्या वतीने याप्रकरणी २६ जूनला मुंबई सायबर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारींनुसार गोपनीयपत्र व अन्य गोपनीय तांत्रिक माहिती बेकायदेशीरपणे उपलब्ध केल्याप्रकरणी कलम ३० भारतीय टेलिग्राफ ॲक्ट १९८५ सह माहिती-तंत्रज्ञान कायदा २००८ कलम ४३(ब),६६ सह द ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट १९२३च्या कलम ५अनव्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सायबर विभागाचे सहायक आयुक्त एन. के. जाधव या प्रकरणाची चौकशी करत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार ते रश्मी शुक्ला यांच्याकडे चौकशी करतील.

रश्मी शुक्ला या अडीच महिन्यांपासून सीआरपीएफमध्ये प्रतिनियुक्तीवर असल्या तरी त्यांचे मुंबईत ‘यशोधन’ या बिल्डिंगमध्ये शासकीय निवासस्थान आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी ११ वाजता त्यांची घरीच चौकशी केली जाणार आहे. अतिवरिष्ठ दर्जाच्या अधिकारी आणि कोविडच्या महामारीमुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते.

Leave A Reply

Your email address will not be published.