सिरम इन्स्टिट्युटला सायबर चोरट्यानी घातला तब्बल १ कोटी रुपयांना गंडा

0

पुणे : सिरम इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांच्या नावाने बनावट व्हॉटसअ‍ॅप मेसेज पाठवून सिरम इन्स्टिट्युटला सायबर चोरटयांनी तब्बल १ कोटी रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार ७ ते ८ सप्टेंबर दरम्यान घडला आहे.

याप्रकरणी सिरम इन्स्टिट्युटचे फायनान्स अधिकारी सागर कित्तुर (४४, रा. कोंढवा) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर कित्तुर हे सिरम इन्स्टिट्युटमध्ये फायनान्स व्यवस्थापक आहेत़ तर सतीश देशपांडे हे कंपनीचे संचालक आहेत.

आदर पूनावाला हे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे़त. आदर पूनावाला यांच्या नंबरवरुन बनावट व्हॉटसअ‍ॅप मेसेज देशपांडे यांना आले़, त्यात काही बँक खात्यांचे नंबर देऊन त्यावर तात्काळ पैसे पाठविण्यास सांगितले.

हे मेसेज खरे वाटल्याने कंपनीच्या खात्यावरुन विविध बँक खात्यावर एकूण १ कोटी १ लाख १ हजार ५५४ रुपये पाठविण्यात आले. मात्र हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे लक्षात आल्यावर कंपनीकडून पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली असून पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.