घोटाळाच्या पैशातून पुण्याच्या दगडूशेठ गणपतीला दिड किलो सोन्याचा हार अर्पण

0
मुंबई : समृद्ध जीवन घोटाळा प्रकरणातील महेश मोतेवार याने 2013 मध्ये पुण्यातील दगडुशेठ गणपतीला दीड किलो सोन्याचे दागिने अर्पण केले होते. यामध्ये सोन्याचा हार, त्रिशुळ, परशु यांचा समावेश होता.
ठेवीदारांच्या पैशातून दागिने बनवून घेऊन दगडुशेठ गणपतीला दान केले होता. मोतेवार याने दान केलेले 60 लाख 50 हजार रुपये किमतीचे दीड किलो सोन्याचे दागिने सीआयडीने ताब्यात घेतले आहेत.

समृद्ध जीवन मल्टिस्टेट पर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडने विविध योजनांचे अमिष दाखून देशभरातील लाखो लोकांना आर्थिक गुंतवणूक करण्यास सांगून गुंतवणूकदारांना तब्बल 2 हजार 512 कोटी रुपयांचा गंडा घातला होता. याप्रकरणी मोतेवार याची 207 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने अॅटॅच केली होती. लाखो गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी महेश मोतेवार याला 2015 मध्ये अटक करण्यात आली होती.

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी मनिषा पाटील यांनी सांगितले की, महेश मोतेवार याने गुंतवणूकदारांची फसवणूक करुन केलेल्या आर्थिक घोटाळ्यातील पैशांचा वापर त्याने कोठे केला आहे याचा शोध घेतला जात होता. त्यावेळी या दागिन्यांविषयी माहिती मिळाली. ठेवीदारांकडून घेतलेल्या पैशातून मोतेवार याने सोन्याचे दागिने घेतल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर आम्ही दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्टशी संपर्क साधला. धर्मदाय आयुक्तांना हे दागिने तपासात पाहिजे असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर धर्मदाय आयुक्तांनी ट्रस्टला पत्र पाठवून तपासात सहकार्य करण्यास सांगितले. त्यानुसार ट्रस्टने या प्रकरणात सहकार्य करुन मोतेवार याने दान केलेले सर्व दागिने आमच्या ताब्यात दिले आहेत. यापूर्वी मोतेवार याच्याकडून 40 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यासंदर्भात दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सांगितले की, गोरगरिबांचा तळतळाट घेऊन अर्पण केलेले दागिने बाप्पा देखील स्विकारत नाही, अशी आमची भावना आहे. बाप्पाच्या चरणी अनेकजण काहीना काही अर्पण करत असतो. त्यावेळी तो कोण आहे, याची काही माहिती आम्हाला नसते. भावना आणि कायदा यामध्ये गल्लत होता कामा नये. धर्मदाय आयुक्त हे आमचे प्रमुख असून त्यांच्या आदेशानुसार आम्ही मोतेवार याने अर्पण केलेले दागिने सीआयडीच्या ताब्यात दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.