नवी दिल्ली : सध्या जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे भारतात ही भितीचं वातावरण निर्माण झाले आहे. हा व्हेरिएंट आधीच्या डेल्टा किंवा डेल्टा प्लसपेक्षा कमी घातक असल्याचं जरी बोललं जात असलं, तरी अद्याप त्याचा पूर्ण अभ्यास होणं बाकी असल्यामुळे शास्त्रज्ञ आणि संशोधक अजूनही छातीठोकपणे निर्धोक राहण्याचा सल्ला देत नाहीत. शिवाय, ओमायक्रॉन वेगाने प्रसारीत होणारा व्हेरिएंट असल्यामुळे अवघ्या २० दिवसांत तो ५७ देशांमध्ये पसरला आहे.
देशात व्यापक लसीकरण झाल्यामुळे लोकांमध्ये कोरोनाबाबतच्या नियमाकडे काहीसं दुर्लक्ष करण्याची वृत्ती दिसून येऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीयांना नीती आयोग आणि करोनाबाबतच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी गंभीर इशारा दिला आहे.
आरोग्य विभागानं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. व्ही. के. पॉल यांनी ओमायक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार आणि भारतीयांकडून करोनाच्या नियमांकडे होणारं दुर्लक्ष यावर भाष्य करताना चिंता व्यक्त केली आहे. “भारतात मास्क घालण्याचं प्रमाण हळूहळू कमी होऊ लागलं आहे. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की लस आणि मास्क या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत.
आपण जागतिक परिस्थितीपासून शिकायला हवं. आपण सध्या या बाबतीत डेंजर झोनमध्ये आहोत आणि अतिशय जोखमीच्या आणि अस्वीकारार्ह अशा पद्धतीने वर्तणूक होऊ लागली आहे”, असं व्ही. के. पॉल यांनी नमूद केलं.