यवतमाळ ः ”शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे चीन-पाकिस्तानचा हात असल्याचे बेताल वक्तव्य करणारे भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांची जीभ कापणाऱ्याला दहा लाखांचे बक्षीस देऊ”, अशी घोषणा यवतमाळमध्ये शिवसेनेच्या आंदोलनात विधानसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी केली आहे.
पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि दानवेंच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी यवतमाळमधील दत्त चौकात शिवसेना सैनिकांनी प्रचंड घोषाणाबाजी केली. त्यावेळी ढवळे बोलत होते. संतोष ढवळे पुढे म्हणाले की, ”शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रावसाहेब दानवे यांची जो कोणी जीभ कापेल, त्याला आपण १२ लाखांचे वाहन भेट देऊ. त्या क्षणापासून आपण पायी फिरू, वाहन वापरणार नाही. एवढेच नाही तर, त्याला आणखी १० लाख रुपये देऊ”, अशी ढवळे यांनी घोषणा केली.
”दानवेंची जीभ कापण्यासाठू आपण कुणावर अवलंबून राहणार नसून स्वतःही योग्य संधीची प्रतिक्षा करू”, असेही ते म्हणाले. शिवसेनेच्या आंदोलनापूर्वी भाजपानेही काही वेळापूर्वी दत्त चौकात आंदोलन केले होते.