दर्शना पवार हिच्या हत्येचा उलगडा; ‘या’ कारणासाठी केला मित्राने खून

0

पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांनी दर्शना पवार हत्याकांडातील संशयित आरोपी राहुल हांडोरेच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याला मुंबईत अटक करण्यात आली. सध्या पोलिस त्याची कसून चौकशी करत आहेत. आतापर्यंतच्या चौकशीत राहुलने दर्शनाची लग्नाच्या मुद्यावरून हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनी दर्शनाची हत्या लग्नाला नकार दिल्यामुळे झाल्याचे स्पष्ट केले. पोलिस म्हणाले – आरोपीचे नाव समजल्यानंतर त्याला बुधवारी रात्री उशिरा मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली. त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याला लवकरच न्यायालयापुढे हजर केले जाईल. त्यानंतर या गुन्ह्याचा पुढील तपास स्पष्ट होईल.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, राहुलची दर्शनासोबत लग्न करण्याची इच्छा होती. दोघेही एमपीएससीची परीक्षा देत होते. या प्रयत्नांत दर्शनाला प्रशम यश मिळाले. तिने वन विभागाची परीक्षा उत्तीर्ण केली. दर्शना आता फक्त अधिकारी बनण्याची औपचारिकताच उरली होती. पण दर्शनाच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसर्‍या एका मुलासोबत ठरवले होते. तिच्या लग्नाची तयारीही सुरू केली होती. यामुळे राहुल हांडोरे अस्वस्थ झाला होता. त्याने मला परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी थोडा वेळ द्या, मी सुद्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनेल, अशी ग्वाही दर्शना व तिच्या कुटुंबीयांना दिली. पण त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याने दर्शनाची राजगडाच्या पायथ्याशी हत्या केली.

दर्शना दत्तू पवार एमपीएससी परीक्षेत राज्यात 3 ऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून तिची निवड झाली होती. त्यामुळे पुण्यातील एका संस्थेकडून तिचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यासाठी 9 जून रोजी दर्शना पुण्याला आली होती. त्यावेळी ती एका मैत्रिणीकडे थांबली होती. त्यानंतर 12 जून रोजी राजगड किल्ल्यावर जात असल्याचे दर्शनाने आपले कुटुंबीय व मैत्रिणींना सांगितले होते.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, राजगडावर जाताना तिच्यासोबत तिचा मित्र राहुल हांडोरे होता. त्यानंतर अचानक तिचा मोबाईल बंद झाला. तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण तिचा कोणताही थांगपत्ता लागला नाही. यामुळे त्यांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवली. त्यानंतर दर्शनाचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी आढळून आला. त्यानंतर झालेल्या शवविच्छेदनात दर्शनाचा खून झाल्याच स्पष्ट झाले. त्यानंतर आता पुणे ग्रामीण पोलिसांनी हांडोरेला मुंबईतून अटक करण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.