दाऊद, राजन गेले आता ईडी, सीबीआयकडून खंडणी वसुलीचे काम !: अतुल लोंढे

संजय राऊत यांच्या आरोपांची राज्य सरकारने दखल घेवून आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करावी

0

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. ईडीने मुंबईतील ७० बिल्डरांकडून ३०० कोटी रुपये वसुल केल्याचा राऊत यांचा आरोप गंभीर आहे. दाऊद, राजन गेले आणि आता ईडी, सीबीआय या केंद्रीय यंत्रणा खंडणी वसुलीचे काम करत आहेत हे अत्यंत गंभीर असून मुख्यमंत्री महोदयांनी या आरोपांची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्र पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

अतुल लोंढे पुढे म्हणाले की, ईडी, सीबीआय, आयकर या केंद्रीय तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या बटिक झालेल्या आहेत. घटनेने दिलेले काम सोडून या यंत्रणा गैरभाजपा सरकारे पाडण्याचे काम केंद्र सरकारच्या आदेशावर करत आहेत.

ईडीवर ३०० कोटींच्या वसुलीचे केलेले आरोप अतिशय गंभीर व वाईट आहेत. संजय राऊत यांनी पुरव्यासह हे आरोप केले आहेत त्याची दखल घेऊन कारवाई करावी. दररोज भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपाचे किरीट सोमय्या यांच्यावरही संजय राऊत यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत.


पीएमसी बँकेत हजारो सामान्य लोकांनी पैसा गुंतवलेला होता, त्याच पैशांचा वापर झाला असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. किरीट सोमय्यांवर झालेल्या आरोपांची गंभीर दखल घेऊन चौकशी करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र सरकारने ईओडब्ल्यूच्या माध्यमातून या रॅकेटचा शोध घेऊन हे रॅकेट उध्वस्थ करावे, अशी मागणीही लोंढे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.